
तू लहान होतास तेव्हा
मीही लहान होते.
आत्ता करू शकले असते
तसं प्रेम तुझ्यावर करू नाही शकले.
दिवसातनं निदान एकदा
ऐकू येते तुझी हाक
अजूनही कुठल्यातरी खिडकीतनं
पाहत असशील माझी वाट.
माझी सावली दिसली रे दिसली
की पळत येशील
त्या हरणासारख्या डोळ्यांनी
थेट माझ्या डोळ्यात बघून जाब विचारशील.
चूक-बरोबरच्या हिशोबात
तूच हरवून गेलास
देवाकडनं आला होतास
उडून परत तिथेच पोचलास.
पाखरासारखा तुझा जीव
अजून आमच्यात खेळतो
तुझी आठवण येते तेव्हा
भुर्रकन जवळ उडून येतो.
देवाकडे पहिल्यांदा मागते
पुढच्या जन्मी आपली भेट नको
जो आनंद मी देऊ नाही शकले
त्याच्या तुला शंभर पट मिळो.