
त्या झोपेत असल्यासारख्या स्तब्ध पाण्यामधनं एक भरजरी साडी नेसलेली देवी बाहेर पडतांना पाहून, मी विचारात पडलो की तिथे उभं राहावं की पळून जावं? तिला नमस्कार करावा की तसंच डोळे वटारून तिच्याकडे बघत राहावं? शेवटी मी तसाच उभा राहिलो, फक्त डोळे नीट केले. बोलायला काही सुचत नसल्यामुळे मी घसरत घसरत ह्या विचारात पोहोचलो की जर ही पाण्यातनं आली आहे, तर हिची साडी ओली कशी नही बुवा? ह्या माझ्या चुकीचा वेळेला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळायच्या आधीच, मला जरा जास्त महत्वाची गोष्ट दिसली. ती गोष्ट त्या देवीच्या हातात होती. जास्त चमकणारी न्हवती, म्हणून लगेच लक्ष गेलं नव्हतं माझं. पण आता लक्षं गेलं असल्यामुळे त्याच वस्तूकडे बघत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. बघता बघता किती वेळ गेला काय माहीत. शेवटी माझं तोंड आपोआप उघडतंय असं जाणवल्यामुळे मी पटकन घसा साफ केला आणि तिच्याकडे बघितलं. ती जलदेवता नुसती बघतच बसलेली. तेव्हा ही बया कधी तोंड उघडून मला सांगेल की तिच्या हातात चक्क सोन्याची कुऱ्हाड आहे, अशी मी वाट बघत बसलो.
किती वेळ वाट बघतोय आपण हे जाणून घेण्यासाठी तीन वेळा थेट सूर्याकडे पाहून झालं, पण सूर्य तिथेच हाताची घडी नि तोंडावर बोट ठेऊन उभा होता. हळूच एक आवाज आला: “काय रे! उभा आहेस नं नुसता विठोबासारखा? वीट आणून देऊ का? सोन्याची देऊ? नको नको... तुझं तोंड तर सोनं बघून अगदी कडेकोट बंद होतं नाही का? अरे बाकीचे मूग गिळून गप्प होतात. तू काय सोनं बघून गप्प होणार का? जा की! हो पुढे! आणि आधी ते सोनं हातात घे. मग हो किती होतोस तेवढा गप्प. अरे तू ज्या मातृभक्तिबद्दल बोलत फिरतोस, तिचं काय झालं? विसरलास का तिला? जन्म दिलाय तिने तुला, तिला एक सोन्याची वाटी सुद्धा नाही देववत? आणि ज्या बायकोबद्दलच्या प्रेमाच्या तू गोष्टी करतोस, ते प्रेम कुठे गेलं? तिच्या माहेरी? नाही करवत का तुला एक मंगळसूत्र तिच्या रिकाम्या गळ्यात घालायला? तुमचं एक मूल आहे, विसरलास? रोज त्याचं रडगाणं ऐकशील की त्याला सोन्याच्या चमच्याने दही साखर भरवशील?”
मी दचकून विचारातनं बाहेर आलो. मी वर, त्या निर्दय सूर्याकडे पहिलं, मग जरा आजू-बाजूला बघितलं. तो माझ्याशी बोलत नसावा, असा मी स्वतःला धीर दिला.
मागे वळून बघितलं तर ती देवी तशीच माझ्याकडे बघत उभी होती. हिच्या तोंडात काही कोंबलं असेल का? ह्या भलत्याच विचाराने मला हसू आलं! मनातल्या-मनात हसत असताना, मला पुन्हा एकदा आवाज ऐकू लागला. ह्या वेळी मात्र तो सोज्ज्वळ होता. “ही कुऱ्हाड तुझीच आहे का?” तो आवाज माझ्या समोरूनच आलाय, हे कळायला मला काही क्षण लागले. ती जलदेवता बोलत होती! म्हणजे तिच्या तोंडात काही नव्हतं तर! चला, एका विचाराचं नीटपणे उत्तर मिळाल्यामुळे मला अगदी बरं वाटलं.
ही तिच्या तोंडात काही तरी भरलं असण्याची चिंता आता मनात नसल्यामुळे, मला जास्त गंभीर गोष्टींचा विचार करता येत होता. मघाशी मला तो आवाज जे सांगून गेला, ते सगळं मला आठवलं. घरच्यांनी काय काय सहन केलं होतं माझ्यासाठी, ते ते मला क्रमाने आठवायला लागलं.
बराच वेळ “हो, हीच माझी कुऱ्हाड” ह्या वाक्याची मनातल्या मनात रंगीत तालीम करून झाल्यावर, मी पुन्हा तिच्याकडे बघितलं. ती पुन्हा म्हणाली, “ही तुझीच कुऱ्हाड आहे का?” आता मला कळलं की उत्तर द्यायची वेळ आली आहे. नुसतं ओठांचा एक विशिष्ट आकार करून एका श्वासात एक शब्दच तर बाहेर काढायचा आहे. मग आजू-बाजूला जेवढी हवा सापडली तेवढी आत घेऊन मी उत्तर देणार, तेवढ्यात कोणीतरी मधे बोललं: “नाही, ही माझी कुऱ्हाड नव्हे.”
इतके वेगवेगळे आवाज ऐकूनसुद्धा मला हा ओळखू आला नव्हता. भिर्रकन फिरलो मी, पण कोणीच दिसलं नाही. जलदेवता परत आत जात होती. तेवढ्यात मला कळून चुकलं की हा आवाज माझाच होता! जे म्हणायचं आहे ते न म्हणता बरोबर काय ते म्हणण्याइतकं माझ्याएवढं दुसरं कोणीच वेडं नव्हतं!
Previous
Next