
आलेल्या गाड्यांमध्ये मी चढले नाही
गेलेल्या गाडीची वाट पहात राहिले
कधीतरी येईल म्हणून
तशीच उपाशी बसून राहिले
शेवटी एक घास, एक घोट
पोटात गेल्यामुळे शांत झोप लागली.
झोपेत काही स्वप्न पडली.
हळूच, आवाज न करता
एक गाडी येऊन गेली
मला सोडून सगळ्यांना घेऊन गेली.
दूर कुठेतरी माझ्या स्वप्नांच्या जागी
उभी राहून म्हणाली,
“मी पोचले. बघत बस आता माझी वाट!”
पुन्हा एकदा, आलेल्या गाड्यांमध्ये मी चढले नाही
गेलेल्या गाडीची वाट पहात राहिले.
एवढी वाट पाहून मी शिकले
ती आली नाही तरी मला जावं लागेल
कितीही गर्दी असली तरी
तसंच सगळं सामान घेऊन
कुठेतरी चढावं लागेल.
Previous
Next