
सगळी घरं झोपली होती. माझ्या आजूबाजूला फक्त वेग-वेगळ्या पक्षांची गाणी होती. इतकी शांतता होती की झाडांवरनं पडणाऱ्या पानांचाही आवाज ऐकू येत होता. तितक्यात, त्या सोसायटीला न शोभणारी शांतता जाणवल्यासारखा, एका कुकरने जोरात शिट्टीच मारली! त्या घरच्या खिडकीपाशी एक कावळा गात बसलेला. ह्या अचानक मिळालेल्या साथीचा त्याला आनंद न झाल्यामुळे तो जोरानं खेकसला. आपलं सुंदर गाणं एका कुरूप व बेसुर कावळ्याने बिघडवलं ह्याचा फार संताप येऊन दोन-चार चिमण्या मोठ्याने आणि तावातावाने गाऊ लागल्या. त्या तिघांची--- कावळ्याची, चिमण्यांची आणि कुकरच्या शिट्टीची--- जुगलबंदी काही वेळ चालली. नंतर शिट्टी थकली आणि गप्प बसून राहिली, पक्षी एकमेकांकडे तोंड वाकडं करून वेगळ्या दिशांना निघून गेले. तेव्हा काही लोकांना जाणवलं की आता शांतता मोडायची आपली पाळी आहे. हे लक्षात येताच भर-भर जाऊन त्यांनी आपापले टी.व्ही. लावले. एका घरात मात्र नवरा-बायकोंच भांडण चाललं होतं. त्यांच्या वाक्यांमध्ये फार अंतर होतं. मला वाटलं, त्यांना सुचत नसेल कशlवरून भांडावं... #इगो! असो. मला जाणवलं की सोसायटीमधल्या काही गाड्या वाकड्या लावल्या आहेत. त्यांच्यापैकी दोन गाड्या लाल आणि बुटक्या आहेत आणि त्यांचे wipers बंद नसल्यामुळे ते अगदी त्यांच्या शिंगांसारखे दिसतात. त्या गाड्यांच्या समोर जाऊन पाहीलं तर त्यांच्याकडे बघून असं वाटतं जणू त्या म्हणत आहेत, “चल की! जरा वेळ bullfight खेळू!” असल्या विचित्र विचारांनी माझं मन भरून समाधान झालं तेव्हा मला बरेच पडदे सरकवण्याचे आवाज आले. चला... सगळे उठले म्हणजे चहाची वेळ झालेली दिसते. असा विचार मनात येताच तो अमृततुल्यचा सुगंध आला. तो चहाचा कप डोळ्यासमोर आल्यावर मला ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला की जसं इतर माणसांपासून अंतर राखावं लागतंय, तसं चहापासून राखावं लागत नाही.
Previous